शेती परवडतच नाही मग हे शेतकरी भाडेपट्ट्याने लाखो कमावतातच कसे?

जामखेड ः शेती परवडत नाही म्हणून खूप शेतकरी हे गाव सोडून शहरात येतात. धड त्यांना तेथेही रोजगार मिळत नाही. गावाकडे जी परवड होते ती शहरातही होते. त्यातून काही शेतकरी नाईलाजाने आत्महत्येचा मार्ग निवडतात. परंतु परिस्थितीला आपल्या पायाखाली दाबून मोठे होतात. भाडेपट्ट्याने शेती घेऊनही लाखो, करोडो रूपये कमावतात. त्या शेतकऱ्याची ही कहाणी आहे. कृषी महाविद्यालयातील प्रियांका घुले या विद्यार्थिनीने ती कहाणी शोधून काढली आहे.


नगर जिल्ह्यातील जामखेड हा शेवटचा तालुका. येथील गावांना नेहमीच दुष्काळ पाणीटंचाई चा सामना करावा लागतो. त्यातीलच हे धोंडपारगाव. येथील संतोष मोहनराव पवार यांनी ॲग्री व इलेक्ट्रिकल पदविकेचे शिक्षण घेतले. वडिलोपार्जित ४० एकर शेती. मात्र अवर्षणाचे संकट कायमच. परंतु मनासारखी नोकरी मिळत नसल्याने विविध कंपन्यांत इलेक्ट्रिकल ची कामे घ्यायला सुरुवात केली. त्यात चांगली प्रगती झाली. नगर, पुणे, औरंगाबाद येथे कामे  सुरू असताना ते गावाकडून नगर शहरात राहायला आले.

व्यवसाय चांगला सुरू होता. पण मातीची ओढ सतावणार नाही तो शेतकरी कुटुंबातील कसा? त्यांच्या धोंड पारगाव या मूळ गावात त्यांच्या वडिलांनी १२ एच एफ गाईंचे  संगोपन करून दुग्ध व्यवसाय सुरू केलेला आहे. यातूनच प्रेरणा घेऊन आणि काळाची गरज ओळखून त्यांनी देशी गीर गाईंचे संगोपन सुरू केले. त्यासाठी त्यांनी गुजरात वरून ६ देशी गीर गाई आणल्या आणि टप्प्याटप्प्याने त्यात वाढ केली. आजघडीला त्यांच्याकडे १८ मोठ्या तर लहान जनावरे मिळून ५० गाईंचे गोकुळ आहे. 

दिवसाला १०० ते १२५ लीटरपर्यंत दुधाचे संकलन होते. तीन किलोमीटर परिसरात सुमारे ११० ग्राहकांना देशी दुधाची होम डिलिव्हरी देण्यात येते. या दुधाचा दर ७० रुपये प्रति लिटर आहे. देशी दुधाला दर्जा रहावा यासाठी सेंद्रिय चारा महत्त्वाचा आहे. 

सेंद्रिय चाऱ्यासाठी ते त्यांनी भाडेतत्त्वावर घेतलेल्या शेतीचा उपयोग करतात. नगर शहराजवळील  नगर - औरंगाबाद रस्त्यानजीक बुऱ्हाणनगरच्या हद्दीत ६ वर्षांपूर्वी १० एकर आणि त्यानंतर पुन्हा १५ एकर अशी २५ एकर शेती भाडेतत्त्वावर घेतलेली आहे. त्यात ते टोमॅटो, वांगी, कारले, दोडके, गवार, भेंडी, काकडी, पालक आदींचे सेंद्रिय पद्धतीने उत्पादन घे तात. यातच १५ एकर वर चारा उत्पादन घेतले जाते. शेतीसाठी गोमूत्र व शेणखत याशिवाय कोणतेही खत वापरले जात नाही.

सेंद्रिय शेती व त्याची बाजारपेठ यांना चालना देण्यासाठी त्यांनी नगर - औरंगाबाद रस्त्यावर पुन्हा भाडेतत्त्वावर जागा घेत अलीकडेच ' मधुबन ऑरगॅनिक हॉटेल ' सुरू केले आहे. त्यांच्याच गोशाळेतील देशी गाईंचे देशी दूध, तूप उपलब्ध केले आहे. सध्या येथे उपलब्ध असलेले जेवण संपूर्णपणे सेंद्रिय नाही, तरीही ६०-७० टक्क्यांपर्यंत सेंद्रिय मालाचा वापर केला जातो. 

ग्राहकांचा या संकल्पनेला चांगलाच प्रतिसाद आहे. हॉटेल परिसरात ग्राहकांना बसण्यासाठी कमी खर्चात बांबूची घरे तयार केली आहेत. पुढे येथे निसर्ग पर्यटन केंद्रही उभारायचे आहे. मागच्या रबी  मध्ये त्यांनी २ एकरांवर केवळ शेणखत व गोमूत्र यांचा वापर करून सेंद्रिय पद्धतीने गव्हाचे पीक घेतले होते. येथे साधारण चाळीस लोकांना रोजगार मिळाला होता.

माती पाणी तपासणी केंद्र

संतोष पवार यांनी नगर औद्योगिक वसाहतीत शासकीय परवान्यासह माती, पाणी, पान - देठ तपासणी केंद्र सुरू केले आहे. माफक व सरकारी दरात ही सेवा शेतकऱ्यांना देण्याचा त्यांचा प्रयत्न आहे. येथे ६ जण कार्यरत आहेत.

रोपवाटिका

 हॉटेल शेजारीच त्यांची विविध प्रकारच्या फुलांच्या आणि शोभेच्या रोपांनी समृद्ध अशी रोपवाटिका आहे.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post