केंद्र सरकारने रेमडेसिवीरची निर्यात थांबवली, लॉकडाउनचंही ठरलं

 
नवी दिल्ली : देशात कोरोनाच्या दुसऱ्या लाटेने आरोग्य यंत्रणेचे कंबरडे मोडले आहे. महाराष्ट्रात तर हाहाकार उडाला आहे. पैसे देऊनही उपचार मिळत नाहीत, अक्षरशः स्मशानात नातेवाईकांशिवाय मृतदेह जळत आहेत. महाराष्ट्र सरकार केंद्रावर ठपका ठेवत आहे, तर केंद्र सरकारमधील मंत्री महाराष्ट्राला कोरोना स्थिती हाताळता आलेली नाही, असं सांगत फिरत आहेत.

रेमडेसिवीर इंजेक्शन दिले जात नाहीत, कोरोना लसीचाही तुटवडा जाणवता आहे, या सगळ्यात राजकारण मात्र जोरात सुरू आहे. आरोप-प्रत्यारोपांमुळे केंद्र सरकारने रेमडेसिवीरची निर्यात थांबवली आहे. विशेष म्हणजे आपल्या देशात गहजब सुरू असताना रेमडेसिवीर बाहेर जातेच कसे, असा सर्वसामान्यांना प्रश्न पडला आहे.

या औषधाची गरज सर्वांत जास्त आहे. हे लक्षात घेता केंद्र सरकारने आता रेमेडेसिव्हीर औषधाची परदेशातील निर्यात थांबवली आहे. देशातील परिस्थिती जोवर सुधारत नाही तोवर या इंजेक्शनच्या निर्यातीवर बंदी घालण्याचा निर्णय केंद्र सरकारने घेतला आहे.

रेमडेसिव्हीरच्या देशातील सर्व उत्पादकांनी त्यांच्या वेबसाइटवर, त्यांच्या स्टॉकिस्ट / वितरकांचे तपशील देण्याचा सल्ला दिला आहे, जेणेकरुन हे औषध मिळण्यात सहजता यावी. महाराष्ट्र सरकार जिल्ह्यातील सिव्हिल हॉस्पिटललाच रेमडेसिवीर इंजेक्शन देणार आहे. मधले स्टॉकिस्ट, मेडिकल दुकानदारांना वगळले जाणार आहे. दुसरी समिती जिल्हाधिकाऱ्यांच्या नियंत्रणाखाली असेल, असे आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले.

प्रत्येक रूग्णाला रेमडेसिवीर इंजेक्शनाची आवश्यकता नसते. काही डॉक्टर त्यांना हे इंजेक्शन दिले पाहिजे याचा आग्रह धरीत आहेत. तसे न करता आवश्यतेनुसारच हे इंजेक्शन द्यावे असे आवाहन आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी केले आहे. केंद्र सरकारने रेमडेसिवीरच्या निर्यातीला बंदी घातल्याने लोकांना ते सहज मिळेल. प्रत्येक जिल्ह्याच्या स्तरावर लिक्विड अॉक्सीजन उपलब्ध करून दिला जाणार आहे. जे इंजेक्शन आणि अॉक्सीजनचा काळाबाजार करतील त्यांच्यावर कारवाई केली जाईल, असा इशारा आरोग्य मंत्री टोपे यांनी दिला आहे.

किती दिवसांचा लॉकडाउन

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व आरोग्य मंत्री राजेश टोपे यांच्या थोड्यावेळापूर्वी बैठक झाली. या बैठकीत राज्यातील सर्व स्थितीचा आढावा घेण्यात आला. लॉकडाउन लागणार आहेच परंतु तो किती दिवसांचा असावा याविषयी बैठकीत चर्चा झाली. काहीजणांना वाटत होते, आठ दिवसांचा लॉकडाउन करावा आणि त्यानंतर कोरोनाची साखळी तुटेल. परंतु तज्ज्ञांच्या मतानुसार लॉकडाउन किमान चौदा दिवसांचा हवा. तर कोरोनाची चैन ब्रेक होईल. त्याबाबत सरकार विचार करीत आहे, परंतु सर्वाधिकार मुख्यमंत्री ठाकरे यांना आहेत, असं आरोग्यमंत्री टोपे यांनी पत्रकारांना सांगितलं.


0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post