बारादरीचे भूमिपुत्र पीएसआय दत्तात्रय पोटे भिंगारमध्ये ठरलेत हिरो

 


अहमदनगर ः लॉकडाउन असले तरी काही लोकांना बाहेर काय चाललंय...यासाठी फेरफटका मारण्याची सवय असते. त्यांना पोलिस चांगले बडवून काढतात. हिंडफिऱ्या लोकांबद्दल कोणाला सहानुभूती असण्याचे काही कारण नाही. मात्र, काही लोकं खरोखर अडकलेली असतात. किंवा काही कामानिमित्त बाहेर आलेली असतात. काही कामाचे निमित्त करून यंत्रणेला वेठीस धरीत असतात, अशा लोकांमुळेच जास्त संसर्ग होण्याची शक्यता असते. 

या फिरणाऱ्या लोकांना फटके देण्यापेक्षा त्यांचे प्रबोधन करण्याचा भिंगारचे पोलीस उपनिरीक्षक दत्तात्रय ज्ञानदेव पोटे यांनी फंडा वापरला. तो फारच असरदार सिद्ध झाला. पोलिस फटके न देता चांगल्या गोड शब्दांत काही सांगत आहेत, हे लोकांना पटायला लागले. त्यामुळे लोकांनी स्वतःहून घराबाहेर पडण्याचे टाळले.

या कामाची नोंद घेत पोलिस निरीक्षक पोटे यांचा भिंगारकर तसेच नगरकरांनी गौरव केला. कोविडच्या काळात प्रत्येकासोबत प्रेमाने वागणे गरजेचे आहे, तेच पोटे यांनी केल्याने त्यांचा हा सन्मान करण्यात आला. सुमित गुप्ता, आदेश शिरसाठ, अशोक शिंदे, कुणालसिंग चव्हाण, नितीन सोले आदींनी ही भिंगारकरांच्या वतीने कृतज्ञता व्यक्त केली.

दत्तात्रय पोटे हे कॉन्स्टेबल होते. परंतु काही महिन्यांपूर्वी एमपीएससी स्पर्धा परीक्षेत गुणवत्ता सिध्द करून ते उपनिरीक्षक झाले. भिंगार कॅम्प पोलीस ठाण्यात ते सध्या कर्तव्यावर आहेत. ते मूळ नगर तालुक्यातील बारादरीचे रहिवासी आहेत. 

कोविडच्या काळात त्यांनी नेहमी जनतेच्या प्रश्नांना महत्त्व दिले. ते समजून घेत त्यांची सोडवणूक केली. त्यांची कार्याबद्दल असलेली तळमळ व प्रामाणिकपणामुळे नागरिकांनी हा गौरव केला.

मी माझे कर्तव्य करीत आहे. लोकांचे प्रश्न समजून घेतले की सुटतात यावर माझा भरोसा आहे. लोकांनी केलेला हा सत्कार पुरस्कारापेक्षा कमी नाही. भविष्यातही लोकांना विश्वासात घेऊनच काम केले जाईल.

- दत्तात्रेय पोटे, उपनिरीक्षक, भिंगार पोलिस स्टेशन.


0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post