अखेर गृहमंत्री अनिल देशमुखांचा राजीनामा, कोणतं सरकार येऊ देत कायम मंत्री असायचे!

 
मुंबई ः गृह मंत्री अनिल देशमुख यांनी अखेर आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे त्यांनी हा राजीनामा दिला आहे. त्यावर मंत्री नवाब मलिक यांनीही भाष्य केलं आहे.

अंबानी यांच्या बंगल्यासमोर स्फोटकांचे वाहन उभे केल्याने पोलिस अधिकारी सचिन वाझे अडचणीत आले होते. त्यानंतर मुंबईचे आयुक्त परमबीरसिंग यांनी गृहमंत्र्यांवर १०० कोटी रूपयांच्या वसुलीचा आरोप लावला होता. विरोधी पक्ष असलेल्या भाजपने गृहमंत्री देशमुख यांच्या राजीनाम्यासाठी रान पेटवले होते. पोलिस महासंचालकपदी हेमंत नगराळे यांची नियुक्ती केली. या कारवाईनंतर परमबीरसिंग यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र लिहून अनिल देशमुख यांच्यावरच खंडणीचे आरोप केले. वाझेमार्फत ते वसुली करायचे. वाझे यांच्यावर मनसुख हिरेन यांना जीवे मारल्याचा आरोप आहे. स्वतःला मोठा अधिकारी सिद्ध करण्यासाठीच वाझे यांनी बनाव रचल्याचीही माहिती समोरे येते आहे.

कुठे पडली ठिणगी
गृहमंत्री अनिल देशमुख एका कार्यक्रमासाठी गेले होते. तेथे त्यांना पोलिसांच्या बदल्यांबाबत प्रश्न विचारण्यात आला. काही अधिकारी चुकल्यामुळेच त्यांना हटवण्यात आलं. हे उत्तर परमबीर यांना जिव्हारी लागलं. त्यांनी गृहमंत्र्यांवर लेटरबॉम्ब टाकला. देशमुख यांनी अर्थातच हा आरोप फेटाळून लावला. स्वतः साव असल्याचे दाखवण्यासाठीच परमबीरसिंग असे करीत असल्याचा डांगोरा पिटला जात आहे.

अपक्ष असलेला देशमुखांचा दबदबा
अनिल देशमुख हे विदर्भातील आहेत. नागपूर जिल्ह्यात वाढविहिरा हे त्यांचे गाव आहे. १९९५मध्ये त्यांनी आपल्या राजकीय कारकीर्दीला सुरूवात केली. १९९५मध्ये युतीचे सरकार आले. अपक्ष निवडून आलेल्या  देशमुख यांनी थेट मंत्रीमंडळात प्रवेश मिळवला. १९९९मध्ये ते राष्ट्रवादीत गेले. त्यांनी राष्ट्रवादीकडून निवडणूक लढवली. आणि सरकार आल्यावर थेट कॅबिनेट मंत्री झाले. सार्वजनिक बांधकाम खाते असताना त्यांनी वरळी सी लिंक सुरू केलं होतं. मात्र, उदघाटनावेळी ते मंत्रिपदावर नव्हते. २००९मध्ये पुन्हा राष्ट्रवादीचे सरकार आले. त्यांना पुन्हा मंत्रिमंडळात संधी मिळाली. २०१४मध्ये त्यांना पुतण्यानेच पराभूत केलं होतं. २०१९मध्ये मात्र, त्यांनी पुन्हा विजयाची संधी साधली आणि थेट गृहमंत्री झाले. परंतु त्यांना खंडणीच्या आरोपामुळे अर्ध्यातूनच मंत्रिमंडळ सोडावं लागलं. फडणवीस सरकारमध्ये वगळता ते कायम मंत्री राहिले. कोणाचेही सरकार आले तरी ते पदावर असायचे.

मी नैतिकता पाळतो

अनिल देशमुख यांनी राजीनामा देताना म्हटलं आहे, माझ्याविरोधात कोर्टात याचिका दाखल झाली आहे. त्यामुळे चौकशी होण्याची शक्यता आहे. अशावेळी मी पदावर राहणे योग्य नाही. तेव्हा मी माझ्या पदाचा नैतिकतेमुळे राजीनामा देत आहे.


0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post