नगर जिल्ह्यात आजपासून कडक जनता कर्फ्यू, पालकमंत्री मुश्रीफ यांचे सूतोवाच

अहमदनगर- दिवसेंदिवस कोरोना उग्र रूप धारण करीत आहे. त्यामुळे प्रशासनानेही हात टेकले आहेत. लॉकडाउन लावल्यानंतरही लोकांची बाजारांत मोठी गर्दी असते. बाधितांच्या मृत्यूचेही प्रमाण वाढले आहे. विरोधकांनी पालकमंत्री तथा ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांना वाढत्या रूग्णसंख्येमुळे धारेवर धरले होते. 

आज त्यांनी जिल्ह्याचा दौरा केल्यानंतर येथील गंभीर स्थिती त्यांच्या निदर्शनास आली. दररोज किमान तीन हजार कोरोना रूग्ण सापडत आहे. त्यामुळे आज मोठा निर्णय जाहीर केला. आज ३२८० रूग्ण आढळून आले.

आजपासून तब्बल चौदा दिवसांचा जनता कर्फ्यू लावण्याचे संकेत दिले. जिल्ह्याच्या दौऱ्यात असतानाही त्यांनी हा निर्णय घेतला. त्यांनी जिल्ह्यातील लोकप्रतिनिधींसोबत बैठक घेतली. प्रशासनाकडूनही आढावा घेतला. त्यानंतर ही घोषणा केली. यावेळी मंत्री प्राजक्त तनपुरे, आमदार रोहित पवार, आमदार नीलेश लंके, आमदार संग्राम जगताप, जिल्हाधिकारी राजेंद्र भोसले, एसपी मनोज पाटील आदी उपस्थित होते.

लोकांकडून हयगय होते आहे. परंतु ही ती वेळ नाही. त्यामुळे प्रत्येकाने घरात बसणे आवश्यक आहे. तसे होताना दिसत नसल्याने पुढील चौदा दिवस कडक निर्बंध लावले जातील, असे सुतोवाच पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी केले.

जिल्ह्यासाठी सध्या ६० केएल अॉक्सीजनची आवश्यकता आहे. मात्र, त्यापैकी केवळ २२ केएलच अॉक्सीजन उपलब्ध होत आहे. रेमडेसिव्हीर इंजेक्शन मिळवण्याचा प्रयत्न आहे. पुढचे काही दिवस त्रास सहन करा. सर्व काही व्यवस्थित होईल, असेही ते म्हणाले. रात्री जिल्हाधिकारी भोसले पुढील निर्बंधाबाबत आदेश काढणार असल्याचे समजते. त्यानंतर वेळेचा उलगडा होईल.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post