खरंच मेहेकरीला कोविड सेंटर होणार? शिवसेना आक्रमक, पोटेंचाही पाठपुरावा

 


मेहेकरी ः नगर जिल्ह्यासह तालुक्यात कोरोनाने थैमान घातले आहे. नगर तालुक्यातील मेहेकरी गावात कंटेन्मेंट झोन जाहीर झाल्यानंतरही प्रशासनाने उपाययोजना केलेल्या नाहीत. तालुक्यात दोनच कोविड सेंटर असल्याने लोकांना चांगले आरोग्य उपचार मिळत नाहीत. त्यामुळे तालुक्याचे सभापती आणि उपसभापतींनी प्रशासनाकडे पाठपुरावा सुरू केला आहे. सामाजिक कार्यकर्ते सुधीर पोटे यांनीही पुढाकार घेतला आहे.

बारा गावांशी संपर्क

मेहेकरी फाटा हा मोठा स्पॉट आहे. या गावाचा परिसरातील दहा ते बारा गावांशी संपर्क आहे. त्यामुळे वेळीच उपाय योजना न केल्यास कोरोनाचा मोठ्या प्रमाणात फैलाव होऊ शकतो. नगर शहरातही कोविड सेंटरमध्ये बेड शिल्लक नाहीत. जेऊर आणि मेहेराबाद येथील कोविड सेंटरही अपुरी पडत आहेत.

मराठा विद्या प्रसारक समाज संस्थेचे सद्गुरू हायस्कूल येथे आहे. त्या जागेवर कोविड सेंटर सुरू करावे, अशी मागणी पोटे यांनी केली आहे. मेहेकरी, बारादरी, रतडगाव, रांजणी, माथणी, कौडगाव, बालेवाडी, जांब, पारगाव, पारेवाडी, सोनवडी, पिंपळगाव, शहापूर, केकती अशी मोठी गावे आहेत.

लोकांमध्ये टेस्टिंगची भीती

मेहेकरी गाव कंन्टेन्मेंट झोन झालेले आहे. कोविड हा संसर्गजन्य आजार असल्याने त्याचा मोठ्या प्रमाणात फैलाव होतो आहे. लोकांकडून नियमांचे पालन होत नाही. ज्यांना बाधा झाली आहे, ते भीतीपोटी टेस्टिंग करून घेत नाहीत. त्यामुळे आणखीच या आजाराचा फैलाव होऊ शकतो. त्या पार्श्वभूमीवर गावात कोविड सेंटर करण्याची नितांत गरज आहे, असे पोटे यांचे म्हणणे आहे.

आमच्याकडे स्टाफ नाही

मेहेकरी येथे कोविड सेंटर उभारले जावे, यासाठी प्रशासनासोबत संपर्क सुरू आहे. आरोग्य विभागाला याबाबत कळविले आहे. मात्र, त्यांच्याकडून पुरेसे कर्मचारी नसल्याचे कारण सांगितले जाते. तरीही आमचा पाठपुरावा सुरू आहे, असे शिवसेनेचे संदीप गुंड यांनी सांगितले.

इंजेक्शनचा काळाबाजार थांबवा

सभापती सुरेखा गुंड व उपसभापती डॉ. दिलीप पवार यांनी संयुक्तरित्या जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन दिले आहे. त्यात म्हटले आहे की, नगर तालुक्यात मोठ्या प्रमाणात कोरोनाचा फैलाव झाला आहे. कोविड सेंटर किंवा खासगी रूग्णालयात बेड मिळत नसल्याने नागरिकांचे हाल होतात. तसेच सध्या रेमडेसिवीर इंजेक्शनचा काळाबाजार केला जात आहे. त्याला आळा घालून नगर तालुक्यातील सर्वच प्राथमिक आरोग्य केंद्रांना औषधांचा पुरेसा साठा उपलब्ध करून द्यावा.

लोकांना मेहेकरी येथे कोविड सेंटर सुरू होण्याची आस आहे. आता नेमके कोविड सेंटर सुरू होणार की नाही याची उत्सुकता सर्वसामान्य नागरिकांमध्ये आहे.0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post